पुणे: दोन चोरट्यांनी प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी जाणार्या एका कॅबला अडवून चालकला चाकूचा धाक दाखवून कॅब पळून नेली. कॅब पळवून नेताना वाटेत दोन रिक्षा, कार व पादचार्याला धडक देऊन ते पळून गेले. पुणे येथील अंडी उबवणी केंद्र चौक ते जंगली महाराज रोड दरम्यान रविवारी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.
अक्षय भाऊसाहेब काळे (वय १९, रा. कासार आंबोली, पिरंगुट) यांनी खडकी पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुस्तफा शफिर कुरेशी ऊर्फ मुसा (वय १९, रा. महादेववाडी, खडकी) आणि सिद्धांत चव्हाण (रा. पत्रा चाळ, बोपोडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅबने देहू ते पुणे रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होते. अंडी उबवणी केंद्राजवळील चौकात ते आले असताना मुस्तफा कुरेशी व सिद्धांत चव्हाण यांनी त्यांची गाडी अडविली. जबरदस्तीने गाडीची चावी काढून घेतली व गाडीचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिश्यातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना जबरदस्तीने गाडीत टाकले. गाडी वेगाने चालविताना त्यांनी एक पादचारी, दोन रिक्षा व एक स्विफ्ट कारला मागून धडक दिली. जंगली महाराज रोडवर फिर्यादी यांना खाली उतरवुन कार घेऊन ते पळून गेले. पुधिक तपस खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ करीत आहेत.