पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : मागील कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती असणाऱ्या चिपळुणातील बहादूर शेख चौकामधील उड्डाण पुलाचे काम सुरू असतानाच , सोमवारी ( दि .१६ ) सकाळी या उड्डाणपुलाला तडा गेला.
यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तयार झालेल्या पुलाचा भाग क्रेनसह कोसळला . या अपघातात तीन ते चार जणांना किरकोळ दुखापत झाली . आ.शेखर निकम याचवेळी तडा गेलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आले असताना हा पूल कोसळला.
यावेळी झालेल्या धावपळीमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या दोन कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली . या घटनेनंतर मुंबई – गोवा महामार्गाची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत,आमदार भास्कर जाधव यांनी अनेकदा केला आहे.
या घडलेल्या घटनेबाबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांना ‘राज्य लोकतंत्र’ च्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारली असता ‘मुंबई- गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची चर्चा गेली काही दिवस सुरू होती. आज चिपळूण येथील पूल कोसळल्याने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. चिपळूण येथील पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे’ अशी आमची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.












