पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : “चीनकडून आर्थिक रसद घेतली जात असल्याच्या नावाखाली १०८ ठिकाणी छापे टाकून १७ पत्रकारांवर कारवाई करण्यात आली. याच मुद्दयाचा वापर लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप करेल. ‘चायनीज टेरर फंडिंग’ व ‘खलिस्तान’ या मुद्द्यांच्या आधारावर आगामी लोकसभा निवडणूक भाजप लढवेल,” असे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी स्मारक निधीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनात गुरुवारी पी. साईनाथ यांनी ‘आजचे वर्तमान आणि आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते. गांधी सप्ताहाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे.
पी. साईनाथ म्हणाले, “देशात ज्याप्रमाणे कोरोनाचा उद्रेक झाला, त्याचप्रमाणे असमानतेचा देखील झाला आहे. देशात १९९१ मध्ये अब्जाधीशांची संख्या शून्य होती. आता त्यांची संख्या १७४ इतकी झाली. यांची संपत्ती ही देशाच्या जीडीपीच्या २० टक्के इतकी आहे. कोरोनाच्या काळात अवघ्या १२ महिन्यांतच अब्जाधीशांची संख्या ४२ ने वाढली. आरोग्य क्षेत्रातूनच हे अब्जाधीश तयार झाले आहेत.”
डॉ. सप्तर्षी म्हणाले, “काही जणांना वाटते, लोकांना आता दिसू नये. त्यांना ऐकू येऊ नये. आपण अंधपणाने मतदान करावे. पण, तसे होऊ देऊ नका. पत्रकारांवर कारवाई करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण, भीती जेव्हा निर्माण होते, तेव्हा विवेक मरतो. तेव्हा आपण सर्वांनी आपला दिवा जपून ठेवावा. विवेकाच्या उजेडातच मतदान करा.”
पी. साईनाथ म्हणाले…..
• कोरोनात कामगारांचे स्थलांतर हे चुकीचे असल्याचे काही माध्यमांनी म्हटले.
• केंद्र सरकारने ३१ मार्च २०२० ला एकाही कामगाराचे स्थलांतर झाले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दिले.
• १४ एप्रिल २०२० रोजी देशात २३ हजार मदत केंद्र सुरू असल्याचे म्हटले.
• कोरोनाकाळात राज्य सरकारने चांगले काम केले, केंद्राने नाही.
• देशात आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांची आत्महत्या.
• देशाचा आत्मा केवळ एकाच भाषेत नाही तर विविध भाषेत आहे.
• मणिपूरमधील परिस्थितीवरून ‘एडिटर्स गिल्ट’वर एफआयआर दाखल.
• ‘इंडिया’ आघाडीने देशातील १४ अँकरची यादी प्रसिद्ध केली. त्यावरून टीका झाली. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या साडेनऊ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याविषयी कोणीच काही बोलत नाही.












