पुणे प्रतिनिधी
आंबेठाण : चाकण-तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीला पर्याय ठरलेला चाकण-आंबेठाण रस्ता केवळ एका चेंबरच्या खड्ड्याने बदनाम ठरू लागला आहे. आंबेठाण (ता. खेड) गावच्या हद्दीत येणारा हा चेंबरचा खड्डा एक ते दोन तास ट्रॅफिक होण्याला कारणीभूत ठरत आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत किंवा एमआयडीसी यापैकी ज्याला शक्य आहे त्याने हा खड्डा दुरुस्त करावा आणि आमची रोजची कटकट संपवावी अशी मागणी आता कामगार, स्थानिक नागरिक करू लागले आहेत.
चाकण ते भांबोली हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो.अवघे काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत रुंदीकरण आणि नुतनीकरण करण्यात आले. या एकूण मार्गापैकी आंबेठाण गावठाणाच्या हद्दीतून रस्त्याचा काही भाग जातो. काही वर्षांपूर्वी गावठाणाला लागून असणारा रस्ता ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीने काँक्रीट केला होता.
त्यामुळे आता जेव्हा या रस्त्याचे काम करण्यात आले तेव्हा हा भाग तसाच ठेवण्यात आला. परंतु पूर्वी काम केलेल्या या अंतरात गटारीचा चेंबर येतो. अवजड वाहतूक होत असल्याने दिवसेंदिवस हा चेंबर असलेला खड्डा खाली खचत आहे. जवळपास दीड ते दोन फुटांपर्यंत हा खड्डा पडला आहे.
परिणामी वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि मग त्यात वाहने अडकण्याचा प्रत्यय येतो. गावठाणातून हा रस्ता असल्याने येथे रस्ता अतिशय अरुंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोकवस्ती आहे. साइडपट्ट्या तर येथे नाहीच. परिणामी वाहने सावकाश चालतात आणि मग ट्रॅफिक होत आहे. सकाळ, संध्याकाळी तर या भागात दोनदोन तास ट्रॅफिक होत असून त्याला केवळ एक खड्डा कारणीभूत ठरत आहे.
मोठ्या वर्दळीचा रस्ता असल्याने आणि एमआयडीसी मधील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा रस्ता कायम धावता आहे. काही दिवसांपूर्वी आंबेठाण येथील पुलाचे काम करण्यात आले.त्यावेळी सात ते आठ दिवस हा रस्ता काही अंतरासाठी बंद होता. जर त्याचवेळी हा चेंबरचा खड्डा दुरुस्त केला गेला असता तर सध्याची ही वाहतूककोंडी झाली नसती.
“प्रवासी आणि वाहन चालक यांना अपघाताला सामोरे जावे लागू नये म्हणून अनेक वेळा काहींनी या ठिकाणी फलक लावले, काहींनी दगड ठेवले तर माजी सभापती दत्तात्रेय भेगडे यांनी चक्क घरातील झाडाची कुंडी नेऊन त्या खड्यात ठेवली होती”.
– शिवाजी भेगडे स्थानिक ग्रामस्थ
“हा चेंबर पाण्याने फुल भरला असून त्यातून दुर्गंधी येत आहे. एक बाजूला खड्डा असल्याने वाहनचालक दुसऱ्या बाजूने वाहन नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सध्या तर दोन दोन तास वाहतूककोंडी होत आहे”.
-संघमित्रा नाईकनवरे सरपंच, आंबेठाण
वास्तविक पाहता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो त्यांनी राहिलेल्या या मार्गांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. खचलेल्या चेंबरचे काम आम्ही तात्काळ करणार असून त्यात पावसाने अडचण येत आहे. दिवसभर मोठी खाइतक असल्याने रात्रीच्या वेळी हे काम करावे लागेल.












