चेन्नईवरून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या ६ई५३१४ या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. या विमानानं चेन्नईवरून सकाळी ७ वाजता उड्डाण केलं होतं. त्यानंतर ८:४५ च्या दरम्यान ते विमान मुंबई विमानतळावर उतरलं. यावेळी विमानतळ प्रशासनाकडून या विमानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षितपणे विमानातून उतरले आहेत. या विमानात १७२ प्रवाशी होते. सध्या या विमानाची चौकशी सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे विमान टर्मिनल परिसरात आणलं जाईल, अशी माहिती सांगितली जात आहे. या घटनेमुळे मुंबई विमानतळावरही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या विमानाने आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर काही वेळासाठी ती धावपट्टी बंद करण्यात आली होती. दरम्यान, या संदर्भातील माहिती इंडिगो एअरलाइन्स एका निवेदनाद्वारे दिली असल्याचं वृत्त हिदुस्तान टाईम्सनं दिलं आहे.
आठवडाभरात दुसरी घटना
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीची घटना २८ मे रोजी घडली होती. त्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर हे विमान विमानतळावर पोहचताच प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी गर्दी केली होती. काही प्रवाशांनी तर आपात्कालीन मार्गाचा वापर करत विमानातून बाहेर पडण्यास प्राधान्य दिलं. बॉम्ब ठेवल्याची बातमी समोर आल्यानंतर आपत्कालीन मार्ग आणि मुख्य दरवाजे यांमधून प्रवाशांना सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर हे विमान तपासणीसाठी खुल्या ठिकाणी नेण्यात आलं होतं. दिल्ली विमानतळावर ही घटना घडली होती.
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या या विमानाच्या उड्डाणापूर्वी इंडिगो क्रूला वॉशरुममध्ये एक चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये विमानात बॉम्ब ठेवल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर क्रूने विमानतळ प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं. तसंच त्या विमानाची तपासणी करण्यात आली होती. तसंच सगळे प्रवासी सुखरुप असल्याचं विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करत बॉम्ब निरोधक पथकाने विमानाची तपासणी केली होती. मात्र, त्यानंतर ही अफवा असल्याची बाब समोर आली होती. या विमानाची कसून तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये काहीही सापडलं नव्हतं. आता आठवड्याभरात दुसरी अशीच घटना समोर आली आहे.