पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०९ : आंबेगाव पठार परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी भारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळी तरुणाचे प्राण भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले. अग्निशमन दलाची जाळी पसरविण्याचा आधीच तरुणाने उडी मारल्याने पोलिसांनी हाताची जाळी करीत तरुणाला झेलले.
हा सर्व प्रकार गुरुवारी (ता. ५) सकाळी नऊ वाजता घडला. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम आणि पथकाने ही कामगिरी केली. या घटनेत तरुणाच्या हात आणि पायाला किरकोळ मार लागला आहे. याबाबत कदम यांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणारा नेपाळी तरुण सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात रखवालदार म्हणून काम करतो.
त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही आजूबाजूच्या इमारतीत रखवालदार म्हणून काम करतात. त्याचा सात दिवसापूर्वीच विवाह झाला आहे. लग्नानंतर तो थोडा • विचित्र वागू लागला असल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले. गुरुवारी अचानक तो एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढला. त्यामुळे तेथील रहिवाशांना माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करण्यास सांगितले तसेच मी सुटीवर असतानाही एका अंमलदारांसह तेथे धाव घेतली.
दरम्यान, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र अग्निशमन दलाची गाडी येताच तो उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. अग्निशमन दलाचे जवान जाळी पसरवेपर्यंत त्याने उडी मारली. त्यामुळे आम्ही हाताची जाळी करून त्याला खाली पडण्यापासून वाचवले. पोलिसांची कर्तव्य तत्परता आणि प्रसंगावधान लक्षात घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी म्हणून ऐश्वर्य कट्ट्याच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.












