पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : रेल्वे स्थानकावर जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्याला रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यासाठी पथक तयार करून सापळा रचला होता .
पुणे लोहगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये खंडाळा, जांबरूख, पळसधरी येथे जबरी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग पुणे येथील पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास जबरी चोऱ्याना आळा घालण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन ते कर्जत पर्यंत पथकाची नेमणूक करण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी स.पो. निरी. बाळासाहेब अंतरकर, सहा.पो.फौ.सुहास माळवदकर, सुनील माने, पो. हवा अमरदीप साळुंखे, संतोष जगताप, इम्तियाज अवटी, शिवाजी सावंत, रुपेश पवार, पो. ना. सचिन राठोड चालक दिलीप खोत आणि राम येवतीकर असे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने दोन महिन्यांमध्ये पुणे रेल्वे स्टेशन ते कर्जत दरम्यान जबरी चोऱ्यांचा सखोल तपास करून तुर्भे रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून रवी सिंग तेजपाल सिंग लुभाना (वय 27 वर्ष रा. 91 मयूर विहार फेज १ त्रिलोक पुरी नवी दिल्ली), यास १६ जुलै रोजी अटक केली. लोणावळा, खंडाळा, जामरुख रेल्वे स्टेशन येथील रेल्वेतील महिला प्रवाशांच्या बॅग, गळ्यातील मंगळसूत्र खिडकीतून हात घालून खेचून चोरी करत होता. आरोपीकडे सखोल चौकशी करून नवी मुंबई येथील सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपीकडून२ लाख १७ हजार रुपये किमती सोन्याचे दागिने आणि ३ लाख १३ हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. आरोपीवर भा द वी कलम ३७९,३४,३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे श्रीकांत धिवरे, भा.पो.से. यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी.इरफान शेख, स.पो. निरी बाळासाहेब अंतरकर, सहा.पो. फौ. सुहास माळवदकर, सुनील माने, पो. हवा. अमरदिप साळुंके, संतोष जगताप, इम्तियाज अवटी, शिवाजी सावंत, रुपेश पवार, पो.ना सचिन राठोड, चालक दिलीप खोत आणि राम येवतीकर यांनी केली आहे.












