आज जागतिक महिला दिन! परंतु एखादा दिवसच महिला दिन असू शकतो का? आजच्या दिवशी शुभेच्छा देऊन मोकळे होता येईल काय? याकडे थोडंस बारकाईने जर पाहिलं तर
रोज दिवस तिचाच तर असतो…
सुरु झाडझुड अन पोळी-भाजीने
अन पसारा आवरण्याने संपतो
नेमका तिचा कोणता दिवस नसतो?
असे प्रश्न मनाला सतावत असतात. त्यातील काही प्रश्न म्हणजे तिच्याच माथी एवढी बंधने, कामे का? अगोदरच निसर्गाने अनेक जास्तीच्या आणि जीवघेण्या शारीरिक जबाबदाऱ्या सोपवून तिच्यावर प्रचंड अन्याय केला आहे. खरंच मानवांचा निर्माता देव असेल तर, “त्या देवाला तिची काहीच कशी दया आली नाही? का तो ही पुरुष असल्यामुळे मुद्दाम तिच्यावर जास्तीची जबाबदारी लादली?” खरंच पितृसत्ताक व्यवस्थेने जगात एकमेव सृजनत्व असणाऱ्या आईला किती बंधनात अडकवले आहे? हिंदी सिनेमातील
जहाँ पाँव में पायल हाथ में कंगन, हो माथे पे बिंदिया
इट हैपंस ओनली इन इंडिया
हे गाणं भरपूर गाजलं. अक्षरशः अनेकांनी ते गाणं डोक्यावर घेऊन नाचले! पण हे गाणं माझ्या डोक्यात बसलं. यातील अभिनय, नृत्य वगैरे सर्व काही ठीक होते परंतु याचे बोल मात्र इथल्या स्त्रीला गुलाम करणाऱ्या परंपरेचे गुणगान करणारे असल्यामुळे ते काही मनाला पटले नाही. हे म्हणजे एकीकडे डॉक्टरने रोग्यांना, “हे खावू नका, ते खावू नका असे सांगायचे” आणि जातांना औषध म्हणून “विष द्यायचे” असं झालं! आज भारतात एकीकडे स्त्री स्वातंत्र्य, समानता, समान काम समान वेतन, महिला आरक्षण इत्यादींच्या वल्गना केल्या जातात आणि दुसरीकडे तिला प्रत्यक्षात एकही अधिकार न देता कोऱ्या चेक आणि कागदावर तिच्या सह्या घेतल्या जातात! “स्त्री म्हणजे घराची अब्रू. ती बाहेर फिरली नाही पाहिजे!” या गोंडस वाक्याखाली तिला स्वातंत्र्य द्यायचे नाही. बाहेरचे जग, स्वातंत्र्य पाहू द्यायचे नाही. तिला घरात बंदिस्त ठेवायचे! इज्जत केवळ स्त्रीनेच सांभाळायची आणि पुरुषांनी मोकाट वागायचे! ही कसली संस्कृती? ही तर घाणेरडी विकृती! एवढेच काय, अनेक ठिकाणी संवैधानिक पदांवर स्त्रिया असतांना त्यांचे नवरे खुशाल कारभार पाहतात. लोकही प्रश्न उपस्थित करत नाहीत. त्या पदांवरील स्त्रियांचे नवरेच अक्षरशः खोट्या सह्या मारून बिनधास्त व्यवहार करतात. बिल उचलतात! सगळीकडे काही आलबेल सुरु आहे.
सज्जनहो! विचार करून ते अमलात आणण्याची क्षमता माणसाकडे आहे. केवळ पुरुष म्हणून नाही तर, “माणसाने माणसांविषयी विचार करून माणसांसोबत माणसाने माणसांसारखे वागावे!” हा अलिखित माणुसकीचा नियम आहे ना? मग खरंच आपण स्त्रीच्या बाबतीत काय आणि किती विचार करतो? हे महत्वाचे आहे की नाही? तिच्यावर निसर्गाने मातृत्व लादले आहे. ते किती कठीण आहे? याचा विचारच न केलेला बरा. केवळ सृजन म्हणून तिचा उदो उदो करून थांबता येईल का? एक तर नऊ महिने पोटात बाळ सांभाळायचे. गोळ्या इंजेक्शन्स? सगळं काही हसत हसत! त्यावर घरातील सर्व कामे. हे शक्तिशाली पुरुषांनो, दोन किलोचा दगड पोटावर बांधून एक दिवसभर फिरून बघा! झाडून काढा, उंडा चुरा, पोळ्या लाटा आणि एकदा फरशी पुसून पहाच! मग कळेल आपल्याला ‘ती काय काय सहन करते ते?’ मरणवेदना सहन करायच्या. लेबर पेन! शेवटी बाळंतपण! मरणकळा! त्यातही सर्व काही व्यवस्थित झालं तर बाळ नाही तर अंत! किती भयंकर, जीवघेणं काम! जावे “ती”च्या वंशा तेंव्हा कळे! एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या माझ्या मुलीने काल मला अनेक गोष्टींचे ज्ञान दिले. हा जीवघेणा खेळ एवढ्यावरच थांबत नाही. त्यानंतर तिच्या शारीरिक मानसिक बाबतीत भयंकर बदल होतात. पोस्टपार्टम कॉम्प्लिकेशन्स, प्रसूती नंतरच्या समस्या! दवाखाने नव्हते तेंव्हा अनेक मातांना आपला जीव गमवावा लागला. त्या सर्व इथल्या अमानवी पुरुषसत्ताक पद्धतीच्या बळीच होत्या! प्रसुतीनंतर इन्फेक्शन होऊ शकते. हृदय, रक्तवाहिन्या संदर्भाने अडचणी निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, अधिक रक्तस्त्राव, श्वास घ्यायला त्रास, असुरक्षितता, बाळ सुखरूप आहे का? याची भीती. मानसिक स्तरावर अनेक बदल होऊन ताणताणाव निर्माण होऊन तिला वेडेपणा, बरळणे, मनावरील ताबा सुटणे इत्यादी आणि असे बऱ्याच शारीरिक आणि मानसिक समस्या, आजार तिच्या जीवनात येऊ शकतात. हे किती पुरुषांना माहिती आहे?
ठीक आहे. निसर्गाने दिलेल्या जबाबदारीला मान्य करू. त्यात पुरुषांचा दोष नाही हे ही मान्य, परंतु त्या कसोटीच्या काळात प्रत्येक पुरुषाने तिची काळजी घेणे हे तरी आपल्या हातात आहे ना? होय नक्कीच! याशिवाय घरातील अनेक कामे, जी पुरुषाला सहज करता येतात ती पण तिनेच करायची. का? पुरुषांना झाडून काढता येत नाही? अंगणात पाणी मारता येत नाही का? होय ही कामे पुरुषांनी करायलाच हवीत. यातही मोठी गंमत आहे! जर एखादा पुरुष घरातील ही कामे करत असेल तर समाजातील इतर स्त्रिया ‘तो बायकांची कामे करतो’ म्हणून आपसांत चर्चा करून त्या पुरुषांची टिंगल करतात! हे कितपत योग्य आहे? असो. अशी अनेक कामे आहेत जिथे एक पुरुष आपल्या घरातील आई, बहीण, वहिनी किंवा पत्नी इत्यादी स्त्रियांना त्यांच्या कामात मदत करू शकतो.
त्यासाठी आज आपण बदलण्याची नितांत गरज आहे! अलीकडे अनेक तरूण उपवर होऊन लग्नाची वाट पहात आहेत! मुला-मुलींचे गुणोत्तर प्रमाण बिघडले आहे. का? तर ते समाजाने स्त्रीभ्रूण हत्या करून स्वतःच बिघडवले आहे! वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची फळे समाज आज भोगत आहे. आज समाजाने स्त्रीकडे केवळ एक स्त्री, अबला, बिचारी, असहाय, परावलंबी इत्यादी भिंगातून पाहणे बंद करावे. ती तुमची आमची माता आहे. ती पत्नी असली तरी ती क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. जगप्रसिद्ध निबंधकार फ्रान्सिस बेकन म्हणतो, “स्त्री तारुण्यात पत्नी, मध्यम वयात मैत्रीण आणि म्हातारपणात परिचारिका (नर्स) असते!” आज पुरुषांनी तिचा आपल्या बरोबरीने विचार केला पाहिजे. ती स्वयंपाक करून आपल्याला गरमागरम खायला देते. ती शेवटी जेवते. कधीतरी आपण तिला गरम गरम खायला द्यायला काय हरकत आहे? स्त्री फार खंबीर, मजबूत आहे. अत्यंत कठीण प्रसंगात स्त्रीच पुरुषांना अनेक उपाय किंवा मार्ग सुचवते. तेंव्हा आपण तिला अबला समजू नये. ती कितीही कठीनातील कठीण कामे सहज करेल! त्यासाठी मात्र तिला गरज आहे ती भावनिक आधाराची! बिचारी ती फार हळवी आहे! आई आहे! चला तर मग भावांनो, एक आई, बहीण, वहिनी, पत्नी एवढेच काय एक स्त्री म्हणून आपण तिची जपणूक करूयात! माणसातील माणुसकी जपुया! ह्याच पृथ्वीवरील प्रत्येक स्त्रीला अनंत शुभेच्छा असतील!