पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील (मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियामातील) नियम २४४,२४५ तसेच जाहिरात व फलक नियंत्रण अधिसूचना ९ मे २०२२ चे अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन म.न.पा. तसेच खाजगी जागेत जाहिरात फलक उभा केलेले आहेत. अशा सर्व जाहिरात फलक परवानाधारकांनी प्रत्येक वर्षात त्यांनी घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण जाहिरात व फलक नियंत्रण अधिसूचना ९ मे २०२२ चे अधिनियमातील तरतुदीनुसार करून घेणे आवश्यक आहे.
प्राप्त तक्रारीनुसार आकुर्डी तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे जाहिरात फलका समोरील वृक्षाची छाटणी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सदरचा फलक हा मे. शुभांगी अॅडव्हटायझींग, काळेवाडी यांचा अधिकृत परवाना असल्याने त्यांना आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत दि. ०५.०९.२३ रोजी महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण दि.०९ मे २०२२ मधील नियम २२ (घ) या नियमाचा भंग केल्याने सदरचा परवानगी रद्द झाले बाबत नोटीस देऊन सदरचा फलक काढून टाकणे बाबत कळविण्यात आले होते.
त्यानुसार त्यांनी सदरची नोटीस प्राप्त झालेनंतर स्वतःहून आकुर्डी तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला अधिकृत परवाना क्र. शुभांगी /अंड/२३/२०१७ असलेला जाहिरात फलक दि. ०८.०९.२०२३ रोजी स्वतःहून काढून टाकणेत आला आहे.
या प्रकटनाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व जाहिरात फलक परवाना धारकांना सुचीत करण्यात येते की, आपल्या जाहिरात फलकासंमोरील कोणत्याही प्रकारची वृक्ष छाटणी अनधिकृतरित्या करण्यात येऊ नये तसेच वृक्षाच्या फांद्या छाटणी करण्यासाठी उद्यान विभागाची पूर्व परवानगी घेऊन कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण दि.०९ मे २०२२ मधील नियम २२ (घ) या नियमानुसार त्यांचा अधिकृत परवाना रद्द करणेत येईल, याची स्पष्ट नोंद जाहिरात धारकांनी घ्यावी असे उप आयुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.












