महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भीमराव बबन साठे (वय-४८ रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भीमराव साठे हे भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या परिसरात बुधवारी आंदोलन केले.
आंदोलन करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे समोर आले. त्यानंतर आव्हाड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. अनावधानाने झालेल्या या घटनेबाबत आव्हाड यांनी माफी मागितली आहे. अशा प्रकारे वर्तन करुन आव्हाड यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. आव्हाड यांच्या कृत्यामुळे देशभरातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत, असे साठे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
माझ्याकडून मोठी चूक झाली, मला माफ करा…
दरम्यान, जितेंद्र आवाहड यांनी एक्स वर व्हिडीओ पोस्ट करुन माफी मागितली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. याचा विरोध म्हणून महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला.
हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते. त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो.
गेली अनेक वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे.डॉ.बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे.
मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही.मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे. मात्र आज मी माफी मागतोय,कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील, हा विश्वास आहे.