जुन्नर : दि. ३० मे रोजी पुणे ग्रामीण पोलीस दलातील दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी संयुक्त पणे जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीतील माळशेज अॅग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्यांचा कार्यक्रमावर ग्रामीण छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील १७ आणि पुणे व इतर जिल्ह्यातील ११ मुलींना तसेच रिसॉर्टच्या मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. याबाबत ओतूर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथकाचे विशाल गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे.
राधाकिसन झनकर (वय ४४), रविंद्र लाड (वय ४७), योगेश वाघ (वय ४६), अक्षय थोरात (वय २६), अतुल जगताप (वय २६), भाउसाहेब गाडे (वय ३८), शाम चव्हाण (वय ४३), अमोल शिंदे (वय ३२), संपत धात्रक (वय ४२), योगेश सांगळे (वय ३७), सागर उगले (वय ३२), किशोर सानप (वय ३३), शिवाजी हराळे (वय ४५), तन्मय बकरे (वय २५), शरद सानप (वय ३४), सागर कर्नावत (वय ३३), सागर जेजुरकर (वय ३५ हे सर्व राहणार नाशिक व त्यांच्यासोबत११ महीला तसेच हॉटेल मालक प्रदिप चंद्रकात डहाळे (रा. २०३ रिष्दी सिष्टी हाईटस, सेक्टर १९ एरोली नवी मुंबई) व हॉटेल मॅनेजर अविनाश अशोक भोगे (वय २९ रा. करवंडी ता.जि.अहमदनगर) यांच्या विरोधात ओतूर पोलीसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (ता.३० मे) दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह जुन्नर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांचे पथकास ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे या गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्यांचा कार्यक्रम चालू असलेबाबत माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून पथकाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकासह या रिसॉर्टवर छापा टाकला. या कारवाईत नाशिक जिल्ह्यातील एकूण १७ तरुण तसेच पुणे व इतर जिल्ह्यातील एकूण ११ मुलींना तसेच रिसॉर्टच्या मॅनेजरला ताब्यात घेतले. अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केल्या प्रकरणी माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टचे मालक प्रदीप डहाळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उप निरीक्षक विश्वास खरात, सहायक फौजदार विशाल गव्हाणे, पोलीस अंमलदार विशाल भोरडे, मोसिन शेख, ओंकार शिंदे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले व शुभांगी दरवडे नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली.