पुणे, ता. १९ फेब्रुवारी – पुना जेरियॅट्रीक केअर सेंटर वृद्धाश्रमाच्या ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. वृद्धापकाळाने येणाऱ्या विविध आजारांशी संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलांनी पारंपारीक वेशभुषेत शिवकालीन पाळणा गीते गाऊन आणि शिवरायांची आरती म्हणून शिवजन्मोत्सव साजरा केला.
कात्रज आंबेगावच्या डोंगरावर असलेल्या या वृद्धाश्रमात जय भवानी – जय शिवाजीचा घोषात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. वृद्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिक पारंपारिक वेश परिधान करून या मिरवणूकीत सहभागी झाले होते. फडकणाऱ्या भगव्या पताका, लाल पायघड्या आणि शिवरायांच्या जयघोषाने वातावरण भारून गेले होते. ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी आंबेगाव परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं कार्यक्रमात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषाकरून छोटे बच्चे कंपनी आजी आजोबांचा उत्साह वाढवत होते. वृद्धाश्रमाचा परिसर शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी दणाणून गेली. ७० वर्षांहून अधिक असलेले वय आणि विविध शारिरीक आजार असतांनाही या जेष्ठांनी तरुणांला लाजवेल अशा उत्साहात शिवजयंती साजरी केली.
यावेळी संस्थेच्ये संस्थापक डॉक्टर संतोष कनशेट्टे, सदस्य दिपाली कनशेट्टे, महेश कनशेट्टे, चंद्रशेखर एनापुरे हेही उपस्थित होते.