पुणे | प्रतिनिधी
पुणे : रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या सदस्यांनी पुणे विभागातील महिला आणि बालप्रवाशांच्या मदतीसाठी एक समर्पित पथक सुरू केले आहे. 15 ऑगस्ट रोजी तेजस्विनी पथक नावाचे समर्पित पथक तयार करण्यात आले आहे. रेल्वे हेल्पलाइन क्र. 139 आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष व्हॉट्स ॲप क्र. 7219613777 बद्दल जनजागृती करण्याचे काम या पथकाला देण्यात आले आहे.
तेजस्विनी पथकाच्या टीममध्ये महिला सहाय्यक उपनिरीक्षक पूनम शर्मा आणि इतर दोन महिला आरपीएफ जवानांचा समावेश आहे. तर हडपसरच्या निरीक्षक प्रिती कुलकर्णी या उपक्रमावर देखरेख करत आहेत. हे अधिकारी पुणे ते लोणावळा दरम्यानच्या गाड्यांमध्ये नियमित प्रवास करत आहेत आणि विशेषतः डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांशी ते संवाद साधत आहेत.
एक समर्पित व्हॉट्स ॲप ग्रुप देखील तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये संबंधित अधिकारी आणि महिला प्रवाशांना जोडण्यात आले आहे. पुणे विभागातील सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्यासाठी महिला प्रवाशांकडून संवाद साधण्यासाठी आणि अभिप्राय घेण्यासाठी आरपीएफ द्वारे या गटाचा वापर केला जातो. हे पथक महिला प्रवांशामध्ये ट्रेननी प्रवास करताना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करत आहे. महिला प्रवाशांनी पुणे विभागातील गाड्यांमधील प्रवासादरम्यान कोणत्याही मदतीसाठी या पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. रामदास भिसे आयआरटीएफ आणि पीआरओ म्हणाले. पुणे विभागाची प्रमुख महिला आहे आणि आम्ही आमच्या महिला प्रवाशांची आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो. तेजस्विनी पथक हे असेच एक पाऊल आहे, ज्यामुळे महिला प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करताना सुरक्षित वाटेल. आरपीएफ कर्मचारी आणि दैनंदिन महिला प्रवेशांचा एक व्हॉट्स ॲप ग्रुप त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत करेल.












