ठाणे : पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर जाग आलेल्या ठाणे उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या हाॅटेल, बार-रेस्टाॅरंटवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली. ठाणे जिल्ह्यातील ११ हाॅटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले आहेत. अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हे परवाने पुढील आदेश होई पर्यंत निलंबित असणार आहे. असे असले तरी ही कारवाई तुटपुंजी असल्याचा दावा नागरिक करत आहे. भिवंडी, ठाणे शहरात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हाॅटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचा आरोप ठाणेकर करत आहेत.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये विकासकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श ही मोटार भरधाव चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरूणीला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट, ढाबे सुरू आहेत. विरोधी पक्षाच्या कडून टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाॅटेल, बारवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मद्य विक्री करण्याचा परवाना असलेल्या परंतु नियमांचे उल्लंघन केलेल्या ११ हाॅटेल, बार विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.
कारवाईचे कारण काय?
या हाॅटेल, बार आणि रेस्टाॅरंटमध्ये अल्पवयीन मुले-मुली (२१ वर्षांपेक्षा कमी) मद्याचे सेवन करताना आढळून आले. परवाना कक्षात विहीत वेळेनंतर महिला सेविका विना नोकरनामा कार्यरत होत्या. आयुक्तालय क्षेत्रात रात्री १.३० आणि ग्रामीण क्षेत्रात रात्री १२ वाजेपर्यंत बार, हाॅटेल सुरू ठेवण्यास परवानगी आहे. असे असतानाही या वेळेहून अधिक काळ बार सुरू होते, विना वाहतुक पासचा मद्यसाठा आढळून आला. तसेच मद्य सेवनाचा परवाना नसतानाही मद्य पुरविले जात असल्याचे दिसून आले.
केवळ दिखावा म्हणून कारवाई ?
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, ग्रामीण पट्ट्यात महामार्गालगत मोठ्याप्रमाणात बेकायदा ढाबे उभारण्यात आले आहेत. या ढाब्यांवर रात्री उशीरापर्यंत अल्पवयीन मुले, परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य पुरविले जाते. रात्री उशीरापर्यंत मद्याच्या पार्ट्या सुरू असतात. महामार्गालगत हा प्रकार घडत आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणे ठाण्यातही एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या ढाब्यांवर होणाऱ्या मद्याच्या विक्रीवर लगाम केव्हा लागेल असा प्रश्न विचारला जात आहे.