पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ : ससून रुग्णालयाच्या परिसरात मेफेड्रॉन अमली पदार्थ सापडल्याची घटन आणि त्यानंतर आरोपी ललित पाटील याचे रुग्णालयातून पलायन या दोन्ही प्रकरणात कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षकासह ९ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली.
चाकण येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात आरोपी ललित अनिल पाटील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला चार जून रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तो रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवत होता.
गुन्हे शाखेने रविवारी ससून रुग्णालयाच्या परिसरातून दोन कोटींचे मेफेड्रॉन जप्त केले होते. या प्रकरणी पाटील याच्यासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्याला रुग्णालयात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक्सरे काढण्यास नेताना त्याने पलायन केले होते.
या प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, पोलिस हवालदार आदेश सीताराम शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम भारत काळे, पोलिस कर्मचारी पिरप्पा दत्तू बनसोडे आणि अमित सुरेश जाधव या पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.
तर, गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या परिसरातून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सहायक उपनिरीक्षक रमेश जनार्दन काळे, पोलिस कर्मचारी विशाल बाबूराव टोपले, स्वप्नील चिंतामण शिंदे आणि दिगंबर विजय चंदनशीव या चौघांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास पवार यांनी दिली.












