पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले अनेक ड्रोन व्हिज्युअल पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाच्या अधिकाऱ्यांना समोर आल्याने पुणे शहर पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान ड्रोनच्या वापरावर कारवाईचा इशारा दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहर पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान शहरात ड्रोनच्या वापरावर यापूर्वी अधिकृत आदेशाद्वारे बंदी घातली आहे.
लक्ष्मी रोडचे ड्रोन व्हिज्युअल इंस्टाग्रामवर अपलोड होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी विमान कायदा, ड्रोन नियम आणि भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचा सोशल मीडिया सेल याबाबत तपशील गोळा करत असून शहरातील ड्रोनचा अवैध वापर थांबविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. गणेशोत्सवादरम्यान ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश आधीच लागू करण्यात आला आहे” पोलिसांनी सांगितले.
शहर पोलिसांनी एका अधिकृत आदेशानुसार गणेशोत्सवादरम्यान 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान ड्रोन, मायक्रो लाइट, हँग ग्लायडर, पॅरामोटर, हॉट एअर बलून आदींच्या वापरावर बंदी घातली आहे. उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात शहरातील गणेश मंडळांना भेट देणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.












