पुणे | प्रतिनिधी
पुणे : कोंढवा येथे शनिवारी एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, कोंढवा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हा मित्रासोबत ढोल ताशाच्या सरावासाठी गेला असता आरोपींनी त्याचे अपहरण करून सासवडला नेले तेथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न परतल्याने ही घटना उघडकीस आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली.
तपासादरम्यान, मृतक त्या मित्रासोबत ढोल ताशाच्या सरावासाठी गेला होता, असे पोलीस पथकाने स्पष्ट केले.
पोलिसांनी मित्राचा शोध घेतला आणि तो घरी जखमी अवस्थेत आढळला. मयत व त्याच्या मित्राचे कोंढवा येथील एका टोळक्याने अपहरण करून त्यांना सासवड येथे नेल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस पथकाने या प्रकरणावर तत्परतेने कारवाई करत साईराज लोणकर (25) आणि ओंकार कापरे ( 25 ) या दोन आरोपींना अटक केली, तर 10 ते 11 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.












