पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १६ : प्रेम संबंध आणि बलात्काराची तक्रार मागे घेत नसल्याने वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने कारागृहात काम करणाऱ्या महिला शिपायाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने योगेश भास्करराव पाटील ( वय ५२ जेलर बंगला, जेलर वसाहत, कोल्हापूर ) या वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वी पीडित महिला आणि आरोपी हे कोल्हापूर येथील कारागृहात कर्तव्यास होते. या दरम्यान दोघांचे प्रेम संबंध जुळून आले होते. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर अनैसर्गिक रित्या अत्याचार आणि बलात्कार केला. या घटनेची दखल घेत महिलेने आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये कारागृह विभागाकडून आरोपीला निलंबित करण्यात आले होते.
या घटनेनंतर पीडित महिला या पुण्यातील येरवडा कारागृह येथे कार्यरत आहेत. काही दिवसांपासून आरोपी हा पीडित महिलेला वारंवार फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगत होता. माझ्याशी बोल, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असेही बोलत होता.
दि. १४ रोजी फिर्यादी या कामावरून घरी येत असताना आरोपीने त्यांना अडवले व मला माहित आहे तू भाड्याच्या घरात राहतेस, आधीच तुझ्या इज्जतीची थू थू झाली आहे. तुला इथे लोक राहू देणार नाहीत, तू माझ्याबरोबर चल असे बोलू लागला.
पीडित महिलेने नकार दिला असता आरोपीने तिच्या घरी जात तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी देत पेट्रोलच्या साहाय्याने पेटवण्याचा प्रयत्न केला. पण महिलेच्या प्रसंगावधानामुळे कोणताही अघटीत प्रकार घडला नाही. महिलेने आरोपीला धक्का देत आतील खोलीचा दरवाजा लावून जीव वाचवला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन जाधव या करीत आहेत.












