पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २३ : खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात बावधन (पुणे) येथील युवकाचा मृतदेह आढळून आला. ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय १८, रा. बावधन, पुणे) असे त्याचे नाव असून, तो रविवारपासून (ता. १७) घरातून निघून गेला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा दुचाकीसह (एमएच १२ व्हीयु ०८७८) नाल्यामध्ये पडला होता. मात्र, झाडी व गवतामुळे तो कोणाच्याही निर्देशनास आला नाही. रस्त्यालगतची झुडपे काढताना त्याची दुचाकी दिसून आल्याने शोध घेतला असता ध्रुव सोनावणे याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.
या वेळी घटनास्थळी खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, भुईजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व खंडाळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व पोलिसांनी भेट दिली. अपघात होऊन ध्रुव याचा मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ध्रुव याचे आई-वडील व आजी हे अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले असता तो बावधन येथील घरी एकटाच होता. रविवारी सकाळी ध्रुव याच्या आत्याने चौकशी केली असता, तो घरी नसल्याचे कळाले. सीसीटीव्हीद्वारे तो रात्रीच १२:४८ मिनिटांनी घर सोडून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांमध्ये नोंदविली.
ध्रुव याचे लोकेशन रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा, भोळी (ता. खंडाळा) व वाई असे दिसत होते. मात्र, रविवारी सायंकाळपासून लोकेशन मिळत नव्हते. दरम्यान ध्रुव याचे वडील व नातेवाईक या परिसरात गेले पाच दिवस कसून शोध घेत होते. या घटनेची खंडाळा पोलिसात (Khandala Police) नोंद झाली असून, पुढील तपास श्री. पोळ करीत आहेत.












