पिंपरी- तळेगाव परिसरातून चोरीला गेलेल्या एकूण १९ दुचाकीसह आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा मुळचा तळेगाव दाभाडे येथीलच असून तो मित्रांच्या ओळखीने दुसऱ्या जिल्ह्यात या दुचाकी विकत होता.
उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे (वय ४०,तळेगाव दाभाडे) असे अटक आरोपीचे नाव आहे.त्याने चोरलेल्या दुचाकी आत्तापर्यंत पालघर व ईगतपुरी येथे पाठवल्याचे तपासाच उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरीस प्रकरणाचा तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत असताना, पथकातील पोलीस अंमलदार हर्षद कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन यशवंतनगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उभे आहे.
माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने घटनास्थळी उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाबाबत आजुबाजुस चौकशी करत त्याला मारूती मंदीर चौकातून ताब्यात घेण्यात आले. त्याला विश्वासात घेत त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली. तळेगाव दाभाडे त्याने हद्दीतुन इतरही दुचाकी वाहने चोरुन ती वाहने त्याचा साथीदार नामे लालु सखाराम मेंगाळ (कॉलनी वाडी इंदोरे, ता. गतपुरी,नाशिक) याच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी सह पालघर जिल्हयातील मोखाडा भागात विकी केल्याचे सांगितले. त्यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासुन आरोपीने दिलेल्या कबुली प्रमाणे खात्री केली.
आरोपीला सोबत घेऊन पोलिसांनी तपास पथकाने नाशिक आणि पालघर जिल्हयात छापे मारले.दरम्यान इगतपुरी येथुन १०, मोखाडा येथील ४ तसेच तळेगाव दाभाडे परिसरातील ५ याप्रमाणे एकुण १९ दुचाकी वाहने अंदाजे किंमत चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्याचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
ही कारवाई तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख रविंद्र खामगळ, कदम, पोहवा कोकतरे, पोलीस अंमलदार कदम, सगर, ओव्हाळ, मोहीते, झेंडे, मदने व पथकाने केली आहे.