पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरुन एका सलून व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.६) सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवरील रामभाऊ पुरुळेकर शाळेसमोर घडला.
याबाबत अनिरुद्ध अशोक चौधरी (वय-३६ रा. वराळे गाव, ता. मावळ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन ओनम भेगडे (वय-४० रा. डोळसनाथ मंदिराजवळ, तळेगाव दाभाडे) याच्यावर भा.दं.वि. कलम ३८७, ५०४ सह फौजदारी सुधारणा कायद्यांतर्गत कलम ७ अन्वय गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचा तळेगाव चाकण रोडवरील धर्मानंद बिल्डींग मध्ये सलूनचे दुकान आहे. चौधरी यांनी आरोपी भेगडे याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. याचा राग आरोपीच्या मनात होता. याच रागातून आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानात येऊन १५ हजार रुपयांची खंडणी मागून पैसे दिले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जोरजोरात आरडाओरडा करुन त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ केली.
आरोपीच्या दहशतीमुळे दुकानातील ग्राहक घाबरून पळून गेले. त्यावेळी दुकानासमोर नागरिकांनी गर्दी केली. फिर्यादी आरडाओरडा करत होते मात्र आरोपीच्या दहशतीमुळे कोणीच मदतीला धावून आले नाही. पुढील तपास तळेगां पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंपणे करीत आहेत.