पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : तव्यावर प्लेट ठेवू न दिल्याच्या रागातून मालकास मारहाण करत लुबाडणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
विजय जगन्नाथ यादव ( वय ३५, रा.संत तुकाराम नगर,पिंपरी ) यांनी निक्की उर्फ दिलीप चौहान ( वय २८, रा. नेहरूनगर,पिंपरी ) व जाफर ( वय २५, खराळवाडी,पिंपरी ) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
फिर्यादी यांचे आदेश डोसा सेंटर नावाचे वाय.सी.एम डेड हाऊस समोर दुकान आहे. दि.२१ रोजी आरोपी हे डोसा खाण्यासाठी त्यांच्या दुकानात आले होते.त्यावेळी जाफर याने तव्यावर डोसाची प्लेट ठेवत चटणी मागितली.चटणी टाकताना ती तव्यावर सांडल्यामुळे फिर्यादी यांनी त्याला सांगितले की तुला चटणी पाहिजे तर मी आणून देतो,तू तव्यावर प्लेट ठेवू नको.या गोष्टीचा राग आल्याने आरोपी याने त्याच्या दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने व बॅटने मारहाण करत जखमी केले.तसेच फिर्यादी यांच्या दुकानातील कामगाराच्या खिशातून १०,००० किमतीचा मोबाईल,दुकानाच्या गल्ल्यातील ११०० रुपये असा एकूण ११,१०० रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले.
आरोपींवर भादवी कलम ३९४,५०४,३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांना एका आरोपीस पकडण्यात यश आले आहे.एका आरोपीचा शोध सुरू आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कोकाटे हे करत आहेत.












