पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड सायबर सेलने तीन दिवस सलग तीन हजार किलोमीटरचा प्रवास करत एका तरुणाला राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. हा तरुण दुबई येथील सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देत होता.
मोहम्मद जुबेर जावेद चव्हाण (वय २१, रा. इस्लामपूर मोहल्ला, ता. फत्तेपूर, जि. सिकर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील एका महिलेची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सविस्तर माहिती सही कि फिलिपेइन्स देशाचा कोड +63 असलेल्या एका क्रमांकावरून बावधन येथील महिलेला आरोपींनी व्हाट्सअपवर मेसेज केला. गुगल रेटिंग टास्क देत हा टास्क पूर्ण केल्यास पैसे देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर महिलेला टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करून घेण्यात आले. महिलेचा विश्वास संपादन करून तिला वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी करत तिच्या कडून एकूण २ लाख ४५ हजार रुपये एका बँक खात्यावर भरण्यास सांगितले.
त्यानुसार महिलेने २ लाख ४५ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार केली. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून करण्यात आला.
सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि पोलीस उपनिरीक्षक सागर पानमाड यांनी महिलेने ज्या बँक खात्यांवर पैसे पाठवले आहेत, त्याची तांत्रिक माहिती प्राप्त केली. महिलेने एका खात्यावर ९५ हजार रुपये पाठवले होते. त्या खात्यावरून ३ लाख रुपयांचे संशयित व्यवहार झाले असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्या बँक खातेधारकास सायबर सेलने शोधून काढले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ती रक्कम राजस्थान मधील मोहम्मद जुबेर जावेद चव्हाण याला पाठवली असल्याचे सांगितले.
त्यामुळे सायबर सेलने मोहम्मद जुबेर जावेद चव्हाण याचा शोध सुरू केला. त्यानुसार सायबर सेलच्या एका पथकाला राजस्थान येथे पाठवण्यात आले. या पथकाने तीन दिवसात तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास करत आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी दुबई येथील सायबर गुन्हेगारांना भारतातील नागरिकांच्या फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देत होता.
नागरिकांची ऑनलाइन माध्यमातून फसवणूक झाली असल्यास त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (www.cybercrime.gov.in) वर अथवा १९३० या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन देखील पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी केले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पानमाड, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार लोखंडे, कारके यांच्या पथकाने केली.