पुणे : पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सोमवारी (दि.२९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती, मावळ, शिरूर, पुणे या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते.
महाराष्ट्र एका ‘भटकत्या आत्म्या’चा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली होती. मोदी यांच्या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मी पुढच्या सभेत भटकती आत्मा कोण हे मी मोदींना विचारेन असं अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कोणता उद्देश ठेवून ही टीका केली हे देखील मोदींना विचारेन असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
जयंत पाटलांचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, नरेंद्र मोदी हे रात्रंदिवस टीका करत असतात. त्यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. पण नरेंद्र मोदींना ४ जूनच्या मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करुन महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे, असे जयंत पाटील यांनी इंदापूर येथील सभेत म्हटले.
काय म्हणाले PM मोदी?
महाराष्ट्रातील एक अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निषाणा साधला.
मी आज जे काही बोलेल ते कोणी व्यक्तीगत आपल्यावर घेऊ नये. काही भटकणाऱ्या आत्मा असतात, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत राहते. ज्याचं स्वत:चं काम होत नाही तर ते दुसऱ्यांचं काम देखील बिघडवायला लागतात. आपला महाराष्ट्र देखील अशाच एका अतृप्त आत्मांचा शिकार झाला आहे. आजपासून ४५ वर्षापूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एक अस्थिरतेच्या काळात ओढला गेला, त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.