पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या देशपातळीवर चर्चेत आहे. कल्याणीनगर परिसरात झालेल्या या अपघातात बड्या बिल्डरच्या मुलाने पोर्शे कारणे धडक दिल्याने एका तरूण आणि तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीने अल्पवयीन आरोपीबात एक्सवर केलेल्या पोस्टमुळे नवीन माहिती समोर आली आहे.
या अपघातानंतर आता शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये सोनाली तनपुरे यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. परंतु, त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने आहे. सोनाली तनपुरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये ब्रह्मा कॉर्पचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलामुळे त्यांच्या मुलाला शाळा सोडावी लागल्याचा प्रसंग मांडला आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये सोनाली तनपुरे यांनी लिहिले आहे की, कल्याणीनगर येथील कार अॅक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता.
त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, असे म्हणत सोनाली तनपुरे यांनी अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाच्या वर्तणुकीबाबतची स्वताच्या मुलाच्या बाबतीमधील घटना एक्सवर नमूद केली आहे. तसेच या पोस्टपूर्वी सोनाला तनपूरे यांनी या अपघातावरील काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा व्हिडिओ देखील रिपोस्ट केला आहे.