दरीत पडलेल्या गाईड मुलाला शिवदुर्ग रेस्क्यू टीम कडून जीवदान, ढाक भैरव येथील घटना
ढाक भैरव या ठिकाणी एक स्थानिक आदिवासी मुलगा (गाईड) ग्रुप घेऊन गेला होता. त्यावेळी मुलगा पायऱ्यांवरुन तोल जाऊन ८०-९० फूट उंचीवरुन खाली पडला. ही घटना सोमवारी (दि.२५) दुपारी तीन वाजता घडली. ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी अथर्व बेडेकर (रा. ठाणे) यांनी लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टिमला फोन करुन याची माहिती दिली. रेस्क्यू टिमने तात्काळ त्याठिकाणी जाऊन रविंद्र होला (वय २४ रा. सांडशी, कर्जत) याला रेस्क्यू करुन सुरक्षीत बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.
घटनेची माहिती मिळताच सायंकाळी पाच वाजता शिवदुर्ग रेस्क्यू टीम कोंडेश्वर मंदिर जवळ पोहोचली. सहा वाजता टीम ढाक भैरव जवळ पोहोचली. ८०-९० फूट उंचीवरुन पडल्यामुळे रविंद्र याला गंभीर मार लागला होता. डोक्यावर दोन खोल जखमा झाल्या होत्या. पाठीला, खांद्याला जबर मार लागला होता. सचिन गायकवाड, दिव्येश मुनी, ओंकार पडवळ, यश सोनावणे, महेश मसने, हर्षल चौधरी, प्रथमोपचार केले व त्यांचे आई, वडीलही तिथे पोचले होते. रविंद्र होला ढाक भैरवकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम करीत होता. सोमवारी तो चार पर्यटकांना घेऊन गेला होता.
टिमने रविंद्रला वाचवण्यासाठी दोन टीम केल्या. ठरल्याप्रमाणे एक टिम खाली व एक टिम कोडेश्वरकडे गेली. संध्याकाळचे सात वाजले होते रविंद्र बोलत होता, उठून चालण्याची तयारी दाखवत होता. काही पाऊले तो चाललाही पण त्याला मार लागला होता. त्यामुळे वेदनाही होत होत्या. चालताना लडखडत होता त्यामुळे टिमने स्ट्रेचर चा निर्णय घेतला. जेवढे शक्य होईल तेवढे लवकर खाली आणायचा प्रयत्न केला. खाली उतरताना अतीतिव्र उतारा मुळे रवींद्र प्रत्येक पाऊल जपून टाकत होता. अंतरही मोठे होते टिमची दमछाक होत होती. दरम्यान गावातील मुलांना याबाबत समजल्यानंतर ते मदतीसाठी आले. तसेच अथर्व बेडेकर व सात ट्रेकर्स मदतीसाठी थांबले होते.
तिव्र उतारावर चालणे व जखमी व्यक्तीला घेऊन जाणे खुपच अवघड जात होते.
खडतर मार्ग पार करून रात्री साडे दहा वाजता खाली सांडशी वाडी येथे जखमी रविंद्र याला घेऊन शिवदुर्गची टीम पोचली. ॲम्बूलन्स आधीच पोचलेली होती. टिमने तात्काळ रविंद्र ला MGM हॉस्पिटलकडे रवाना केले.
शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा
दिव्येश मुनी, सचिन गायकवाड, ओंकार पडवळ, अभिजित बोरकर, रतन सिंग, राजेंद्र कडु, महेश मसने, यश चिकणे, यश सोनवणे, प्रिंस बैठा, हर्षल चौधरी, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, प्रणय बढेकर, मेहबूब मुजावर, सुनिल गायकवाड तसेच कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व गणेश तावरे, पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांचे सहकार्य लाभले.