मुंढवा येथील झेड कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम दरोडा टाकुन लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. ही कारवाई मुंढवा परिसरातील झे़ड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला असलेल्या कच्च्या रस्त्यालगत गुरुवारी (दि.८) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास केली.
हर्षवर्धन उर्फ लकी मोहन रेड्डी (वय-१९ रा. लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) कुलदीप उर्फ कुणाल संजय साळुंखे (वय-१९ मयुरेश्वर कॉलनी, केशवनगर, मुंढवा), तेजस उर्फ सन्नी अश्विन पिल्ले (वय-२० रा. केशवनगर, मुंढवा), शशांक श्रीकांत नागवेकर (वय-२० रा. सुशिल सिद्धी सोसायटी, केशवनगर मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे इतर तीन साथीदार पळून गेले आहेत. आरोपींवर भा.दं.वि. कलम ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार दिनेश मधुकर भांदुर्गे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत केशवनगर येथील लोणकर चौकात आले. त्यावेळी पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना माहिती मिळाली की, झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाच्या मागील कच्चा रस्त्यालगत अंधारात काही मुले थांबले आहेत. ते गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी जाऊन कानोसा घेतला.
‘आज पंपाची सारी कॅश लुटायचीच, अजुन थोडी लोकांची ये-जा कमी झाली की निघु’ अशी चर्चा आरोपी करत होते. यावरुन आरोपी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथक त्यांना पकडण्यासाठी गेले असता आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागला. ते अंधारात पळून जात असताना पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तलवार, लोखंडी कोयता, एक लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, मिरची पुड, रस्सी असे साहित्य जप्त केले आहे. आरोपी कुलदीप उर्फ कुणाल साळुंखे याच्यावर चार दखलपात्र गुन्हे आहेत तर दोन अदखलपात्र गुन्हे आहेत. हर्षवर्धन रेड्डी याच्यावर १३ दखलपात्र गुन्हे आहेत. तेजस उर्फ सनी पिल्ले याच्या विरुद्ध एक दखलपात्र गुन्हा आहे. तसेच शशांक नागवेकर याच्याविरोधात दोन दखलपात्र गुन्हे आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार, संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे, राहूल मोरे, मोहन सारुक, दिपक कदम, प्रमोद जगताप, सचिन पाटील स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे यांच्या पथकाने केली.