पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : “जागतिक आरोग्य संघटनेने व्यसनाला एक मोठा आजार म्हणून जाहीर केले आहे. शंभर लोकांनी दारू पिण्यास सुरवात केली तर त्यातील साधारण पंधरा लोक व्यसनाधीन बनतात अशी एका सर्वेतील आकडेवारी आहे. त्यामुळे यंदा ३१ डिसेंबरला मद्य नव्हे तर दुध पिवून नववर्षाचे स्वागत करूयात,” असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या(अंनिस) सामाजिक कार्यकर्त्या ॲड. मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले.
त्या, येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात, विवेक वाहिनी सेलच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळे प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी, मिलिंद देशमुख, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमीच्या(एमएसएफडीए) समन्वयक डाॅ.हर्षदा बाबरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अरुण आंधळे, उपप्राचार्य, डाॅ.रमेश रणदिवे यादी उपस्थित होते.
या कार्यशाळे प्रसंगी, माणूस अंधश्रद्धेचा मानसिक दृष्ट्या कसा बळी ठरतो हे, काही उदाहरणे व विद्यार्थ्यांसमोरील जादूच्या प्रयोगांद्वारे मिलिंद देशमुख यांनी समजावून सांगितले. तसेच सध्या देवाच्या नावाखाली व्होट बँकेसह नोट बँक तयार केली जात आहे. त्यामुळे या सर्व मायाजाळातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विवेकी विचार पेरण्याची गरज असल्याची भावनाही देशमुख यांनी यावेळी मांडली.
या कार्यशाळेची प्रस्तावना डाॅ.सविता पाटील यांनी तर आभार डाॅ.प्रभंजन चव्हाण यांनी मांडले. तर प्रा.सायली गोसावी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व डॉ. राजेंद्र रासकर, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. देवकी राठोड आदी प्राध्यापकांनी त्यासाठी परिश्रम घेतले.












