पुणे: जुन्या भांडणाच्या कारणावरून दुचीकाला चारचाकी गाडीने जाणूनबुजून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.३०) रात्री साडे नऊच्या सुमारास पानशेत रस्त्यावर घडली आहे. पोलिसांनी चारचाकी गाडीतून चार धारदार कोयते जप्त केली आहेत.
शनिवारी रात्री शिवम उर्फ चिक्या अनंद बरीदे (वय-२३ रा. खडकवासला) हा त्याच्या दुचाकीवरुन नऱ्हे गावाकडे जात होता. त्यावेळी अजय नेटके याने कारमधून पाठीमागून येऊन शिवमच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडून जखमी झाला. त्यावेळी चिक्याने अजय नेटके व त्याच्या तीन साथीदारांना ओळखले. आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन मुद्दाम धडक दिल्याचे त्याच्या लक्षात आले.
चिक्याने तात्काळ डायल ११२ वर कॉल करुन पोलिसांकडे मदत मागितली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चंद्रकांत शिंदे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहताच आरोपी गाडी सोडून पळून गेले. शिंदे यांनी चिक्यकडे चौकशी केली असता, जुन्या भांडणातून अजय नेटके व त्याच्या साथीदारांनी दुचाकीला धडक देऊन जखमी केल्याचे सांगितले. चंद्रकांत शिंदे यांनी आरोपींच्या गाडीची पाहणी केली असता मगील शिटवर असलेल्या पोत्यात चार धारदार कोयते आढळून आले.
याबाबत चंद्रकांत शिंदे यांनी याची माहिती प्रभारी अधिकारी सचिन वांगडे यांना दिली.
वांगडे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुन्ह्यातील आरोपींचा उद्देश व गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. शिवम उर्फ चिक्या अनंद बरीदे याने दिलेल्या फिर्य़ादीवरुन अजय नेटके व इतर तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली. पथकांनी रात्रभर आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.