पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : चार दिवसांपूर्वी प्रभात रोड येथील शौनक इमारती समोरून काळ्या रंगाची मोटार सायकल चोरीला गेल्याची घटना होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला मंगळवार पेठेतून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार (दि.५) गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -१ केली आहे.
सचिन सिद्धाराम चौगुले (वय २३ रा.ओम ब्लड बँक, मंगळवार पेठ, मु.पो.सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी मंगळवार पेठेतील पारगे चौक येथे आशीर्वाद इमारती समोरच्या रस्त्यावर चोरीस गेलेली मोटार सायकल घेऊन थांबला असल्याची माहिती पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप राठोड व धनंजय ताजने यांना बातमीदारामार्फत मिळाली.
त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोटार सायकल व आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान चार दिवसांपूर्वी प्रभात रोड परिसरात मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्या कडून १ लाख रुपयांची बजाज कंपनीची १५० पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाई साठी आरोपीला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त (गुन्हे -१) सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार मॅगी जाधव, गणेश ढगे व आजिनाथ येडे, नारायण बनकर यांनी केली आहे.












