पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्शवभूमीवर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. याशिवाय ई-मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांना 6 ऑगस्टच्या सकाळी लोकल ट्रेनमध्ये ‘सिरियल बॉम्बस्फोट’ करण्याचा इशारा देणारा व्यक्तीचा फोन आला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नुकतेच पुणे पोलिसांनीही दहशतवाद्यांना अटक केली होती. भूतकाळातील अनेक घटनांनी गंभीर चिंता निर्माण केली आहे.
अलंकार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश ताटकरे म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सोशल मीडिया आणि ई-मेल खाते हाताळणाऱ्या व्यक्तीने हा मेल पाहिला. त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. या मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची, हिंदू धर्म आणि महिलांना नष्ट करण्याची आणि गंभीर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. आम्हाला माहिती मिळताच आम्ही तत्काळ रुग्णालयात तपासणीसाठी गेलो.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ईमेल 6 ऑगस्ट रोजी एम ए मोखीम नावाच्या व्यक्तीने पाठवला होता. भारतीय दंड संहिता कलम 505 (2) आणि 506 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
देशभरात बॉम्बस्फोटाचा इशारा : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ई-मेल












