पुणे दि.1 : सध्या पुणे शहरात मेट्रो पूल बांधणीचे काम सुरु आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर गणेश खिंड (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) चौकात मेट्रो पूल बांधण्याचे काम सुरु असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या चौकात पाषाण,बाणेर,औंध व शिवाजी नगर अशा चारही दिशेने वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे.
विद्यापीठ चौकातल्या वाहतूक कोंडीमुळे औंधवरून शिवाजीनगरला जाण्यासाठी गोल- मार्केट ते विद्यापीठ चौका पर्यंत वाहनांची भली मोठी रांग पाहायला मिळते. याच समस्येमुळे नागरिक चतुःशृंगी पोलीस स्थानक समोरून रस्ता ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जाण्याचं प्रमाणं वाढताना दिसत आहे. हा प्रकार गेल्या महिना भरा पासून सुरु आहे. या मध्ये दुचाकी आणि रिक्षाचे प्रमाण जास्त आहे. विद्यापीठ चौकात जरी वाहतूक पोलीस असले तरी नागरिक हे रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जाण्याचं धाडस करतात. पण वाहतूक पोलीस या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. जर एखादा वाहन चालक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जात असताना अपघात झाला किंवा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. वाहतूक विभागाने वेळीच पाऊलं उचलले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
तीन दिवसांपूर्वी कंत्राटी पोलीस कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आला होता. पण नागरिक त्यांचं ऐकत नसल्याचे चित्र दिसत आहे. व नागरिकांचा मनमानी कारभार सुरूच आहे.

सध्या विद्यापीठ चौकात मेट्रोचे काम चालू आहे. त्यामुळे चारही बाजूने येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच वाहन चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस ताफ्यात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे मत चौकातील वाहतूक पोलिसांचे आहे.
नागरिकांनी सुद्धा काही गडबड करून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊ नये. कारण सिग्नल सुटल्यानंतर वाहनांचा वेग ४०किमी प्रति तास पेक्षा खाली नसतो. त्यामुळे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचा अपघात होऊ शकतो. या गोष्टीमुळे वाहन चालकाने नसतं धाडस करू नये.
या विषयी राज्य लोकतंत्रशी बोलताना वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी बाबासाहेब कोळी म्हणाले की, औंध मार्गे जाणाऱ्या बस स्थानका जवळ वाहतूक शाखेचा एक कर्मचारी नेमण्यात येईल. जेणेकरून दुचाकीस्वार रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणार नाहीत आणि अपघात टळेल.
दोन मिनिटांच्या अंतरासाठी जीवघेणा प्रवास












