वाकड: स्पा सेंटरच्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालांवर गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने कारवाई करून दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी दोन दलालांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.७) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील ‘द गोल्ड थाई’ स्पा सेंटर मध्ये करण्यात आली.
याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक रंजित सिंह उर्फ निल राजपुत (वय-३० रा. स्वस्तिक पामस, ठाणे) आणि स्पा मॅनेजर महिलेवर भा.दंड.वि. कलम ३७०(३), ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश सिताराम कारोटे (वय-३६) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पिंपरी चिंचवड येथील स्पाच्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पाच्या नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाला मिळाली. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पिंपळे सौदागर भागातील स्पॉट १८ मॉल मधील शॉप नंबर. ११७ येथे ‘द गोल्डन थाई’ नावाच्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. खात्री झाल्यानंतर पथकाने अचानक छापा टाकला.
त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून दोन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
आरोपींनी पीडित मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या स्पा सेंटरमध्ये ठेवले होते.
आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कारवाईत पोलिसांनी तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने केली.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकांनी अनेक वेळा या परिसरात छापे टाकून स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे. मात्र, तरी देखील अशा प्रकारचे अवैध व अनैतिक व्यापार वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोकं वर काढतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांचा त्या ठिकाणी वचक राहिला नाही का? किंवा पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सगळे गोरख धंदे सुरू आहेत की काय ?अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू आहे.