चाकण: पुणे नाशिक रोडवर चाकण च्या जवळपास एका टेम्पो ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिला खाली पडून महिलेच्या अंगावरुन गाडी गेल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. रुग्णवाहिकेतून तिचा मृतदेह चाकण ग्रामीण रुगणालयात नेण्यात आला. तोपर्यंत तिच्या गळ्यातील मंगळसुत्र गायब झाले होते. त्यानंतर तिच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे मंगळसुत्र कोणीतरी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
वसंतराव भिकाजी गाडे (वय ६९) हे मृत्यू पावलेल्या महिला मंगल वसंतराव गाडे (वय ५४, रा. येलवाडी, ता. खेड) यांचे पती आहेत. वसंतराव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हल्स चालक व चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे आपल्या पत्नीसह ७ डिसेंबर रोजी दुपारी नाशिक रोडने चाकणकडे जात होते. त्यावेळी वाकी खुर्द गावाजवळ त्यांना पाठीमागून आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स गाडीने धडक दिली. त्यात फिर्यादी व त्यांच्या पत्नी खाली पडल्या वसंतराव यांना मुका मार लागला तर त्यांची पत्नी रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्यावरुन गाडीचे पाठीमागील चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह दुपारी २ वाजता आस्था हॉस्पिटल येथून अॅम्ब्युलन्समधून चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी पत्नीच्या गळ्यात ५ तोळे १०० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन होते. त्यानंतर त्यांचे पुतणे प्रमोद गाडे व नातेवाईक अमोल मोहिते हे चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या पोर्चमध्ये गेल. तेथे रुग्णवाहिका उभी होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयांचे मंगळसुत्र कोणीतरी चोरुन नेले. असे फिर्यादीत उल्लेख करण्यात आली आहे. चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.