पुणे : पोर्शे कार अपघातामधील आरोपी बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पोलीस दलापासून सर्वच शासकीय यंत्रणा कशी कामाला लागली होती, त्याचा धक्कादायक पुरावा आता समोर आला आहे. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता ससूनमधील दोन डॉक्टरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल ९ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून श्रीमंताच्या मुलाला वाचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागल्याचे दिसत आहे.
अपघात झाल्यानंतर ९ तासांनी अल्पवयीन आरोपीला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आले. पण या काळात मोठा गोंधळ उडाला होता, लोक संताप व्यक्त करू लागले होते. यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली.
हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडे पाठवण्यात आले. तसेच ससून आणि खासगी रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचा आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असे पुणे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, ते वेगवेगळे असल्याचे उघड झाल्याने सर्वांच्याच पाया खालची जमीन हादरली आहे.