पुणे : वडिलांनी घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला १० ते १५ दिवस लॉजमधील रुममध्ये डांबून ठेवले. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी पोक्सो व पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन महिलेला अटक केली आहे. तर आरोपी पती फरार झाला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी, के.के.मार्केट, धनकवडी येथे घडला आहे.
याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. १४) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पुनम आकाश माने (वय-२२) हिला अटक केली आहे. तर आकाश सुरेश माने (वय-२४ रा.शंकराच्या मंदिराजवळ, कात्रज गावठाण, कात्रज, पुणे) याच्यावर ३६३. ३६६ए, ३४३, ३७०, ३७६, ३७६(२)(एन) सह पोक्सो अॅक्ट, पिटा अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित मुलीच्या वडिलांनी आजारपणासाठी आरोपींकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, त्यांना पैसे परत करात आले नाहीत. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी मुलीला जबरदस्तीने पळून नेत तिला के.के.मार्केट येथील एका लॉजमध्ये १० ते १५ दिवस डांबून ठेवले. त्याठिकाणी आरोपी आकाश माने याने दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठुनही वसुल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी केली. तसेच ग्राहकांकडून पैसे घेऊन तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील करीत आहेत.