पुणे : किरकोळ कारणावरुन शेजारी राहणाऱ्या गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या पोटात असलेल्या अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार पेठेत घडली आहे. ही घटना २७ मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अर्भकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
याबाबत राजू माधवराव चिद्रावार (वय २५, रा. दुसरा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) यांनी गुरुवारी (दि.४ एप्रिल) समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी नवाज नासिर खान (वय २७, रा. चौथा मजला, यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या रफीया खान, नासिर खान आणि सलमान उर्फ टिपू शेख (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३१६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवाज खान याने 27 मार्च रोजी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर लाथ मारली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्य़ादी, त्यांची पत्नी मिरा व पत्नीचा मानलेला भाऊ गणेश कांबळे हे गेले होते. त्यावेळी आरोपी नवाज खान, त्याची आई रफिया खान, नासीर खान यांनी फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मिरा चिद्रावार या गरोदर असल्याची माहिती आरोपींना माहित होती. तरी देखील आरोपींनी मिरा यांच्या पोटात लाथा मारून मारहाण केली. पोटावर लाथा मारल्याने अर्भकाचा मृत्यू होऊ शकतो हे माहित असताना देखील आरोपींनी जाणीवपूर्वक मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच नवाज खान याने फिर्यादी यांच्या ज्युपीटर गाडीवर दगड मारुन नुकसान केले. तर सलमान उर्फ टिपू शेख याने फिर्य़ादी यांना फोन करुन लिसांकडे तक्रार केली तर तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली.
दरम्यान, आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे मिरा यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना मिरा यांच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मिरा यांच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्य़कर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकला अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग रुक्मिणी गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख करीत आहेत.