धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रयत्न…जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
पुणे स्थानकावरील दुपारची वेळ. फलाटावरून वेगाने एक्स्प्रेस गाडी पुढे जात होती. त्याचवेळी धावत आलेला एक प्रवासी गाडी पकडण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याचा तोल गेला. तो फलाट आणि गाडीच्या मध्ये पडताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने धाव घेत या प्रवाशाला बाहेर ओढून काढत त्याचा जीव वाचविला.प्रवाशाचा जीव वाचविणाऱ्या जवानाचे नाव दिगंबर देसाई असे आहे.
देसाई हे पुणे रेल्वे स्थानकावर बंदोबस्ताला आहेत. ते बुधवारी (ता.२७) नेहमीप्रमाणे स्थानकावर त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर उद्यान एक्स्प्रेस येणार असल्याची उद्घोषणा झाली. त्यानंतर वेगाने गाडी फलाटावर आली. गाडी थांबल्यानंतर काही मिनिटांतच ती पुढे मार्गस्थ होऊ लागली. त्यावेळी एक प्रवासी धावत फलाटावर आला. त्याने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला परंतु तो फलाट आणि गाडी यांच्या मध्ये खाली पडला.
त्यावेळी तिथे बंदोबस्तावर असलेल्या देसाई यांनी हे पाहिले. त्यांनी तातडीने धाव घेत त्या प्रवाशाला वर खेचून घेतले. त्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला. देसाई यांनी प्रसंगावधान दाखवून कृती केली नसती तर त्या प्रवाशाचे प्राण गेले असते, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. नंतर त्या प्रवाशाला सुरक्षितपणे दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
प्रवाशांनी धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करू नये. यातून प्रवासी स्वत:च्याच जिवाला धोका निर्माण करीत आहेत. त्यांनी सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे.– राम पॉल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे (पुणे)