पुणे: हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मगरपट्टा येथे नाकाबंदी दरम्यान विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकलस्वाराला थांबून पोलिसांनी त्याला ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यास सांगितले असता त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली म्हणून मोटारसायकलस्वाराला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मगरपट्टा मेनगटजवळ १० ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला. मधुकर सरदारसिंग ठेंग ऊर्फ पाटील (रा. कुबेरा विहार, संजीवनी हॉस्पिटलच्या समोर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार गोकुळ भोसले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार गोकुळ भोसले हे मगरपट्टा मेनगेटवर नाकाबंदीच्या कर्तव्यावर असताना एक मोटारसायकलस्वार विरुद्ध दिशेने आला. पोलिसांनी त्याला थांबवून लायसन्स दाखविण्यास सांगितले त्याचप्रमाणे त्याने मद्यपान केल्याचा संशय आल्याने ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यास सांगितले. त्यास त्याने नकार देत पोलीस अंमलदार भोसले यांना शिवीगाळ केली. पोलीस पैसे मागतात, असे बोलून पोलिसांची बदनामी केली. फिर्यादी व पोलीस निरीक्षक खांडे यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून येऊन त्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी मधुकर ठेंग याला अटक केली असून हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.