पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.२६ : महानगरपालिकेने मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान (ग्राऊंड) घोडेस्वारी (हॉर्स रायडिंग) साठी खासगी संस्थेला भाड्याने देण्यास स्थानिकांनी विरोध नोंदिवला होता मात्र ते विरोध डावलून प्रशासनाने मैदान भाड्याने दिले. त्यानंतर यावर आता आयुक्त शेखर सिंह यांची भूमिका समोर आली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, महापालिका शहरातील नागरिक, मुलांसाठी विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहे. शहरातील खेळाडूंना हॉर्स रायडिंगचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी नरसिंग यादव यांच्या ॲकडमीला चिखलीतील मैदान तीन वर्षांसाठी भाड्याने देण्यात आले आहे. यादव हे तिथे कोच असणार आहेत. महापालिका शाळेतील 40 टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच परिसरातील खेळाडूंसाठीही प्रशिक्षणासाठी स्वतंत्र वेळ देण्याचा विचार केला जाईल.
हॉर्स रायडिंगमध्ये शहरातील दोन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकाविले आहे. सर्वच खेळाच्या प्रकारात शहरातील खेळाडूंना खेळता यावे यासाठी व शहरातून राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठीचा महापालिकेचा उद्देश आहे. गगन नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचेही प्रशिक्षण देण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे.
चिखली परिसरातील नागरिकांची मैदानाची मागणी, भावना योग्य आहे. त्या परिसरातील नागरिकांसाठी या मैदानाच्या 700 ते 800 मीटर अंतरावर महापालिकेचे उद्यानाचे आरक्षण आहे. हे अंतर जास्त नाही.
लवकरच तिथे मैदान विकसित केले जाईल. नागरिकांना मैदान उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, याच जागेवर मैदान हवे हा आग्रह योग्य वाटत नाही, असेही आयुक्त सिंह म्हणाले.












