पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : निवडणूक साक्षरता मंडळांचे काम केवळ मतदार नोंदणी करण्यापुरते मर्यादित नसून लोकशाहीचे महत्व, त्यांची विविध अंगे तसेच मतदारांना त्यांच्या भूमिकेविषयी शिक्षण देण्याचे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फांऊडेशन आणि जिल्ह्यातील १०८ शाळा व महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सामंजस्य करार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीपच्या नोडल अधिकारी अर्चना तांबे, वर्शिप अर्थ फांऊडेशनचे संस्थापक पराग मते, व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी, स्पेक्ट्रम ॲकडमीचे संचालक सुनील पाटील, निवडणूक साक्षरता मंडळाचे राज्यस्तरीय समन्यवक अल्ताफ पिरजादे, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, समन्वयक अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. देशपांडे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही सजग करुन लोकशाही मूल्याची भावना दृढ करुन त्यांना समाजात एक चांगले नागरिक म्हणून त्यांचे कर्तव्य पाडता यावे, ही निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करण्यामागची भूमिका आहे. त्यामुळे प्रत्येक शाळा व महाविद्यालयात एक निवडणूक साक्षरता मंडळ असावे, अशाप्रकारची भूमिका भारत निवडणूक आयोगाची आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग होऊन नवमतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
शहरी भागात आणि युवंकामध्ये मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात उदासिनता दिसून येते. त्यांना लोकशाहीचे महत्व, आपले निवडणूकांप्रती असलेले अधिकार समाजावून सांगण्याची आज गरज आहे. मतदान प्रकियेत सर्वसमावेशकता हे महत्वाचे तत्व आहे. त्या अंतर्गत समाजातील महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती आदी घटकांमध्ये निवडणूक प्रकियेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी संबंधित घटकातील सामाजिक संस्था, व्यक्तींची मदत घेऊन काम करण्यात येत आहे.
मतदान प्रकियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात शाळा व महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय मतदार दिन व संविधान दिनाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी शाळा, महाविद्यालयांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून यामध्ये सहभागी व्हावे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्यांच्या कार्याची नोंद मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेतली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणारा हा पथदर्शी उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी समाजातील विविध घटकांतील नामवंत व्यक्ती यामध्ये सहभागी होत आहे. या उपक्रमाला उर्त्स्फूत प्रतिसादही मिळत आहे. या उपक्रमांची नोंद भारतीय निवडणूक आयोगाने घेतली असून आगामी काळात होणाऱ्या आयोगाच्या दौऱ्याच्यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालयाला भेट देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.












