वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे आज उद्घाटन झाले. या पुलाचे उद्घाटन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. अजित पवार म्हणाले, या पूलासाठी सर्वांनी पाठपुरवठा केला. अनेक शहरांमध्ये रिंग रोड झाले. त्यासाठी नितीन गडकरी यांनी जबाबदारी घेतली. चांदणी चौक जिव्हाळ्याचा आहे. यासाठी खूप अडचणी आल्या मात्र नगरसेवक, आमदार, माजी आमदार, अधिकारी सर्वांनी या पूलासाठी पाठपुवठा केला आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. नितीन गडकरी यांनी पैशाची कमी पडू दिली नाही. दिलदारपणे त्यांनी अडचणी सोडवल्या. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. नेता असावा तर नितीन गडकरींसारखा, असे अजित पवार म्हणाले. मी पालकमंत्री असताना अनेक न्यायालयीन अडथळे आले. मात्र हे सर्व अडथळे पार पाडले. अनेक बैठका घेतल्या. जुना पूल पाडण्याचे यशस्वी नियोजन केले.
अनेक कामे करायची आहेत. कार्यक्रमाला येताना माझी बैठक झाली. मेट्रो मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यायला पाहिजे होते कारण त्यांनी ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर लगेच आढावा बैठक घेतली होती. म्हणजे चांदणी चौकाने कुणालाच सोडलं नाही, असे अजित पवार म्हणाले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे मेट्रोने ‘पुणे वन कार्ड’ द्वारे चांगली सुरुवात केली आहे. हे कार्ड पीएमपीएमएललाही लागू होईल अशी व्यवस्था केल्यास त्याची उपयुक्तता वाढेल. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या आवश्यक भूसंपादनासाठी महानगरपालिकांना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनासाठीही निधी देण्यात आला आहे. पुण्यात १० किलोमीटर जाण्याचा वेळ ३० ते ४० मिनिटे आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पुण्यातून वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होते. उन्नत रस्ते तयार करून ही समस्या दूर करता येईल.












