पुणे : कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार व इतर नऊ जणांकडून ५९ लाख ६८ हजार ५०० रुपये घेतले. त्यांना कंपनीचा लोगो असलेले बनावट लेटर देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते मे २०२३ या कालावधीत खडकी येथे घडला आहे.
याबाबत संदीप बबन इंदलकर (वय-५१ रा. रघुकुलनगरी, औंध रोड, खडकी, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनंजय लक्ष्मण कारखानीस (वय-३० रा. बी.ई.जी. अॅन्ड सेंटर, खडकी), तुषार धनंजय कारखानीस, रोहित धनंजय कारखानीस, नूतन धनंजय कारखानीस, श्रावणी देबनाथ यांच्यावर भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ४६५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय आणि तुषार कारखानीस यांनी रोहित कारखानीस याला नोकरी लावण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादी यांच्याकडून १ लाख ८७ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांनी वेळेत परत केले नाही. दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये कोलइंडी या कंपनीत कोवीडमुळे जागा रिक्त झाल्या आसून त्या भरणार असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. तुमच्या मुलीला कंपनीत नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून १६ लाख ६३ हजार रुपये रोहितच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.
त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये रोहित याने फिर्यादी व त्यांच्या मुलीला खडकी येथील घरी बोलावून घेतले. मुलीचे रजीस्ट्रेशन करायचे असल्याचे सांगून त्याने हाताचे ठसे कोऱ्या कागदावर घेतले. याशिवाय इतर ९ उमेदवारांना व्हिडीओ कॉन्फरन्स, विमान तिकीट, राहण्यासाठी पैसे लागतील असे सांगून त्यांच्याकडून ४१ लाख १८ हजार ५०० रुपये घेतले नोकरी आमिष दाखवून घेतले. त्यानंतर आरोपींनी कोलइंडीया कंपनीचा लोगो असलेले खोटे व बनावट मेडीकल लेटर फिर्यादी व इतर नऊ जणांना पाठवून आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.