न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 29 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पण, त्याआधीच न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दिग्गज आणि अनुभवी नील वॅगनर तुला येत्या 2 कसोटी सामन्यांसाठी घेणार नाही, असं निवड समितीने म्हणताच या खेळाडूने तावातावात कारकीर्दीला अर्जंट ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमून निवृत्त झाल्याची माहिती दिली. न्यूझीलंडचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज निल वॅगनर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. निलच्या या घोषणेसह त्याची 12 वर्षांची अर्थात एका तपाच्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम लागला आहे. निलने न्यूझीलंडचं फक्त कसोटी क्रिकेटमध्येच प्रतिनिधित्व केलं होतं.
निल वॅगनर याने आपल्या 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 64 सामने खेळले. निलने वेस्ट इंडिज विरुद्ध 2012 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत या 37 वर्षीय गोलंदाजाने 122 डावांमध्ये एकूण 260 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. याच निलने न्यूझीलंडला 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2021 मध्ये चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
ऑस्ट्रेलिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मालिकेतील पहिला सामना 29 फेब्रुवारीपासून होणार आहे. निलची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली होती. मात्र त्यानंतरही त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे.
निल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेईंग ईलेव्हनचा भाग नसेल. पहिला सामना हा वेलिंग्टनमध्ये पार पडणार आहे. तर दुसरा सामना हा ख्राईस्टचर्चमध्ये होणार आहे. त्याआधी निलला टीममधून रिलीज केलं जाणार असल्याची अधिकृत माहिती न्यूझीलंडच्या एक्स खात्यावरुन देण्यात आली आहे.