मी भाजपची उमेदवार असताना 2019 मध्ये निवडणुकीत माझा पराभव झाला होता. त्या नंतर मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र, मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या देखील आल्या, त्याकडेही मी गांभीर्याने पाहिले नाही. असे म्हणत माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. पाठित खंजीर खुपसण्याचे माझ्या रक्तात नसल्याची भूमिका पंकजाताई मुंडे यांनी मांडली.
काही माध्यमांनी माझ्या बाबत खोटी माहिती दाखवली. मी शपथेवर सांगते की, मी गांधी परिवारला वैयक्तिक ओळखतही नाही. राहुल गांधी यांना प्रत्यक्षात समोरा-समोर मी आजपर्यंत पाहिले नाही. सोनिया गांधी आणि मी भेटलेले नाही. मी लपून छपून काम करत नाही. मी कोणताही निर्णय मी लपून घेत नाही, जो निर्णय घेईन तो उघडपणे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चूकीची माहिती देणाऱ्या माध्यमांविरोधात मी मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माझं करियर कौडीमोलाचं नाही, २० वर्ष राजकारणात माझं नेतृत्व आहे, त्यांमुळे ज्यांनी या बातम्या केल्या त्यांना कोर्टात पुरावे सादर करावे लागणार आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. पुढील एक ते दोन महिने मी ब्रेक घेणार असून अंतर्मुख होऊन विचार करणार असल्याची माहिती पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिली.माझ्यासाठी पक्षाचा निर्णय अंतिम असेल असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे या भाजपमध्ये नाराज असून त्या लवकरच पक्षांतर करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. या संदर्भात राज्यात नव्याने दाखल झालेल्या बीआरएस पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. तर पंकजाताई मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्हाला आनंदच होईल, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले होते. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील काँग्रेस पक्ष पंकजाताई मुंडे यांचे स्वागत करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या सर्व शक्यता त्यांनी फेटाळल्या आहेत.
पंकजा ताईंना संपवणे अशक्य












