पुणे 10 जुलै 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आणि त्यांचे चिरंजीव रोहित टिळक यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. 1 ऑगस्ट रोजी शहरात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदींनी जागतिक व्यासपीठावर देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे आणि तेच या वर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांचे नाव निवडण्याचे एक कारण आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो.
यंदा पुरस्काराचे ४१ वे वर्ष असून इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, राहुल बजाज, सायरस पूनावाला, मनमोहन सिंग आदी मान्यवरांना यापूर्वी हा पुरस्कार देण्यात आला होता. देशाच्या विकासात निस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान १ ऑगस्ट रोजी शहरात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि ट्रस्टचे विश्वस्त असलेले काँग्रेस नेते शुशील कुमार शिंदे यांच्यासह इतर नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर












