पुणे : आज सायंकाळी पुण्यातील रेसकोर्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा होणार आहे. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि अन्य तीन उमेदवारांसाठी ही सभा होत आहे. तत्पूर्वी, भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या आगमनापूर्वी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यासाठी दहा वर्षात मोदींनी खुप काही दिले आणि येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार बरेच काही देईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील १० वर्षात भरपूर काही दिले. येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार बरेच काही देतील. आज मोदींची पुण्यात सभा आहे ही पुणेकरांनी चांगली बाब आहे. पुणेकरांना मोदींना बघायला मिळेल. तसेच ऐकायला देखील मिळेल. यासाठी पुणेकर उत्सुक आहेत. ही सभा सर्वात चांगली आणि मोठी होईल, असा दावा मोहोळ यांनी केला.मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे, बारामती, शिरुर, मावळ लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभा होत आहे. त्यामुळे चारही मतदारसंघातील महायुतीचे महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. शिवाय जनतादेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. साधारण दोन लाख लोक मोदींच्या सभेला उपस्थित राहतील, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
मोहोळ म्हणाले, येणाऱ्या नागरिकांची योग्य प्रकारे सोय केली आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी घेतली आहे. ट्रॅफिक, वाहतुकीची व्यवस्था आणि पार्किंगची व्यवस्थादेखील योग्य प्रकारे केली आहे. नागरिकांना पाण्याची बॉटल घेण्यास आणि काळे कपडे घालण्यास मनाई आहे. त्यामुळे सभास्थळी पाण्याची सोय केली आहे. तसेच मोदींसाठी भाजपकडून दिग्विजय योद्धा पगडी तयार करण्यात आली आहे.