पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३० : पती व त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून मयत महिलेच्या भावाने तिच्या पती आणि इतर नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांची बहीण तिच्या पतीसोबत वैष्णव अपार्टमेंट रविवार पेठ येथे राहण्यास असून दि. २४ रोजी पतीने त्याच्या इतर नातेवाईकांच्या मदतीने तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच घरा बाहेर काढत घराला कुलूप लावले. तीन दिवस – रात्र त्यांना घरासमोरील जिन्यामध्ये राहण्यास भाग पाडले. झालेल्या त्रासाला कंटाळून महिलेने जिन्याच्या शेजारील डक्टच्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
आरोपींवर भादवि कलम ३०६,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत.












