पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना नगर रोडवरील वाघोली येथे घडली होती. या गुन्ह्यातील चार आरोपींना नागरिकांनी व पोलिसांनी पकडले. ही घटना सोमवारी (दि.२५) पहाटे तीनच्या सुमारास खांदवेनगर, वाघोली येथील ब्ल्यु इन हॉटेलच्या पुढील बाजूस घडली.
याबाबत सुखदेव महादेव निंबाळकर (रा. वाघोली, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नितीन दिनेश बुटीया (वय-31 रा. भिमनगर, बीटी कवडे रोड, पुणे), विकास सुरेश वाघरी (वय-२२ रा.शिवाजीनगर), राहुल आनंद वाघरी (वय-२८ रा. मिठानगर, कोंढवा), राहुल संतोष वाघरी (वय-२० रा. जेजुरी) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुखदेव निंबाळकर हे खांदवेनगर वाघोली येथील ब्ल्यु इन हॉटेल समोरील रोडवर घरी जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी येरवडा कोठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादी येरवडा येथे जाण्याचा मार्ग दाखवत असताना आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील १३०० रुपये व मोबाईल जबरदस्तीने घेऊन पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी व पोलिसांनी आरोपींना पकडले. निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरवे करीत आहेत.