पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : पुण्यातील बालेवाडी परिसरात एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याला गोळ्या घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत गायकवाड असे सहायक पोलिस आयुक्तांचे नाव आहे. त्याची पत्नी मोनी गायकवाड (44) आणि पुतण्या दीपक गायकवाड (34) यांची गोळ्या झाडून हत्या केली. भरत गायकवाड हे अमरावतीच्या राजापेठ परिक्षेत्राचे सहायक पोलिस आयुक्त होते. त्यांचे पुतणे व पत्नी पुणे बालेवाडी परिसरात राहत होते. शनिवारी सुट्टी असल्याने भरत गायकवाड घरी परतले.
रविवारी मध्यरात्री गायकवाड यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपकवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांच्याकडून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. मात्र, खून आणि आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.












